विदर्भातील अकोल्यात जन्मलेला आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारा साहिल इंगळे याने साकारलेला ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ हा लघुपट आता थेट जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) झळकणार आहे.
अकोला - विदर्भातील अकोल्यात जन्मलेला आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारा साहिल इंगळे याने साकारलेला ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ हा लघुपट आता थेट जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) झळकणार आहे. ही केवळ अकोल्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी गौरवाची बाब ठरली आहे, कारण या प्रतिष्ठित महोत्सवासाठी भारतातून निवड झालेला हा एकमेव लघुपट आहे.
सामान्य पार्श्वभूमी, असामान्य स्वप्न
साहिल इंगळे सध्या कोलकात्यातील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये ‘प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. मुळचा अकोल्याचा असलेला साहिल याने याआधी पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन विषयात पदवी घेतली आहे. "जनसंज्ञापनातून मला समजलं की, चित्रपट समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम असू शकतो," असं साहिलने एका मुलाखतीत सांगितलं.
अनोखा विषय, जागतिक भाषेतील प्रस्तुती
‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटात नायजेरियातील युरोबा भाषा आणि बंगाली भाषेचा वापर करण्यात आला आहे. साहिलची या लघुपटाचे निर्माता म्हणून भूमिका असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन इथिओपियाचा विद्यार्थी कोकोब गब्रवारिया टेस्फे यांनी केले आहे. चित्रपटात एका नायजेरियन युवकाची भारतात फुटबॉलपटू होण्याची धडपड आणि त्यामागील संघर्ष अधोरेखित करण्यात आला आहे. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तो वडिलांची शेती विकतो, आणि येथील संघर्षांशी झगडतो – ही कथा जागतिक स्तरावर संवाद साधणारी ठरली आहे.
शून्य बजेट, अपार मेहनत
या लघुपटाचे वैशिष्ट्य म्हणजे शून्य आर्थिक मदत. चित्रपटासाठी फक्त इन्स्टिट्यूटची उपलब्ध साधने वापरण्यात आली. कोणताही व्यावसायिक खर्च न करता, अत्यंत कमी साधनसंपत्तीच्या साह्याने हा चित्रपट साकारण्यात आला. "इच्छाशक्ती आणि कल्पकतेच्या जोरावर कोणतीही गोष्ट शक्य आहे," असे साहिल ठामपणे सांगतो.
२७०० चित्रपटांतून अंतिम १६मध्ये
देशभरातील चित्रपट शिक्षण संस्था आणि विद्यापीठांतून २७०० हून अधिक लघुपट कान्स महोत्सवासाठी पाठवण्यात आले होते. त्यामधून केवळ १६ लघुपटांची निवड करण्यात आली आणि त्यात साहिलचा लघुपट भारताकडून निवडलेला एकमेव प्रतिनिधी ठरला. ही निवड म्हणजे अकोल्यातील एका सामान्य तरुणाच्या असामान्य प्रवासाला मिळालेला आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
कान्स महोत्सव, गौरवाची शिखरयात्रा
‘कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ हे जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक मानले जाते. १९३९ मध्ये सुरू झालेल्या या महोत्सवात चित्रपट दाखवला जाणे हीच एक सन्मानाची बाब आहे. या मंचावर जगभरातील सर्वोत्तम कलाकृती सादर होतात. अशा व्यासपीठावर अकोल्याच्या तरुणाने निर्माण केलेला लघुपट सादर होणं ही महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर भारतासाठीही गौरवाची बाब आहे.
साहिल इंगळेच्या यशामुळे अकोला शहरात उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी त्याच्या कार्याची स्तुती करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर साहिलला शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट्सचा वर्षाव होत आहे.
साहिल इंगळे याचा प्रवास हा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कमी साधनांत, ठाम इच्छाशक्ती आणि सामाजिक जाणिवेने युक्त अशी कलाकृती निर्माण करून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं नाव झळकावण्याचं कार्य साहिलने केलं आहे. त्याचे हे यश भविष्यातील नव्या कलाकारांसाठी दीपस्तंभ ठरेल, यात शंका नाही.