नागपुरात जगातील सर्वात मोठा पडदा असलेले चित्रपटगृह उभारण्यात येणार आहे. 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकार होणार असून, भारताला जागतिक मनोरंजन केंद्र बनवण्याचे ध्येय यामागे आहे.
नागपूर | प्रतिनिधी ‘वेव्ह्ज २०२५’ परिषदेत शनिवारी नागपूरवासीयांसाठी आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली – नागपूरमध्ये जगातील सर्वांत मोठा पडदा असणारे चित्रपटगृह उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या चित्रपटांचे निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या पुढाकारातून साकारला जाणार आहे. भारताला जागतिक मनोरंजन केंद्र बनवण्याचे ध्येय या प्रकल्पामागे असून, प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा अनुभव देण्याचा विश्वास या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांच्या उपस्थितीत झालेल्या या घोषणेमुळे संत्रानगरी नागपूर आता केवळ भौगोलिक नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही देशाच्या केंद्रस्थानी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. “हा प्रकल्प म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने मैलाचा दगड आहे. नागपूरसारख्या शहरात जागतिक दर्जाचं स्क्रीन येणं म्हणजे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी गौरवाची गोष्ट आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जगातील सर्वांत मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आम्ही भारतीय कला, संस्कृती आणि मनोरंजनाची छाप जागतिक पातळीवर उमटवू इच्छितो.”
विक्रम रेड्डी यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “सध्या आंध्र प्रदेशमध्ये भारतातील सर्वात मोठा स्क्रीन आहे. पण आता नागपूरमध्ये त्यापेक्षाही अधिक मोठ्या आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज पडद्याचे चित्रपटगृह उभे करणार आहोत.”
या प्रकल्पामुळे नागपूरचे नाव केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय चित्रपट नकाशावर अधोरेखित होणार आहे. या भव्य चित्रपटगृहामुळे चित्रपट अनुभवाची नवी उंची गाठली जाणार असून, प्रेक्षकांना थेट चित्रपटात असल्याचा अनुभव मिळेल, असे संकेत दिले जात आहेत. नागपूरसारख्या शहरात अशा प्रकल्पाची उभारणी म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक आणि औद्योगिक धोरणांचा यशस्वी परिपाक आहे.